रत्नागिरी : जिल्ह्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वाटत जांबारी फाटा येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी सुमारे ०६.४५ वाजता येथील एका मोकळ्या जागेत बांबूची लाकडे जमा करण्यासाठी गेलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने उघड्यावर टाकलेल्या गावठी हातबॉम्बला स्पर्श झाला.

तो बॉम्ब अचानक हाताळल्या गेल्याने मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये संबंधित महिलेच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.

या गंभीर घटनेनंतर जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २८/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५(अ), १२५(ब), २८८ सह भारतीय विस्फोटक पदार्थ अधिनियम कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच बीडीडीएस (BDDS) पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने संपूर्ण परिसराचा पंचनामा करण्यात आला. या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून आणखी २९ जिवंत गावठी हातबॉम्ब हस्तगत करण्यात यश आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि डीवायएसपी माईनकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि तपासाच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांना आवश्यक मार्गदर्शन केले.

तसेच, घटनास्थळी जप्त करण्यात आलेले २९ जिवंत गावठी हातबॉम्ब नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडून रीतसर परवानगी प्राप्त करण्यात आली.

त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत हे सर्व जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत आहेत.