दापोली : दापोली शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोफत पाणी वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

भाजप दापोली शहर अध्यक्ष अतुल गोंदकर यांच्या उपस्थितीत आणि पुढाकाराने शहरातील विविध टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ भाजप नेते केदार साठे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शहर अध्यक्ष अतुल गोंदकर, शहर सरचिटणीस संदीप केळकर, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते आणि प्रसाद मांडवकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरात वाढती उष्णता आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती ओळखून शहर अध्यक्ष अतुल गोंदकर यांनी स्थानिक पातळीवर तत्परतेने या जनहिताच्या उपक्रमाचे नियोजन केले.

राजकीय कार्यक्रमांपेक्षा समाजहिताच्या कार्याला अधिक महत्त्व देत जनतेच्या अडचणीच्या काळात पाठीशी उभे राहणे हाच पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

भाजपच्या या उपक्रमामुळे दापोलीकरांना तात्पुरता का होईना, पण मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.