
दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मिळविलेल्या दैदिप्यमान यशाची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी केली आहे.
जालगांवकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकेने ८ कोटी ४४ लाख रुपयांचा निव्वळ नफा संपादन केला असून, ३१ मार्च २०२६ अखेर रिझर्व्ह बँकेचे सर्व आर्थिक निकष यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
जालगांवकर यांचे विजन: ५०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार
डॉ. जालगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने या वर्षात ५०० कोटींच्या ठेवींचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले होते.
ते पूर्ण करून बँकेच्या एकूण ठेवी आता ५२६ कोटी ९१ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत. केवळ ठेवीच नव्हे, तर एकूण व्यवसाय ८७० कोटी ४७ लाखांवर नेण्यात जालगांवकर आणि त्यांच्या टीमला यश आले आहे.
थकीत कर्ज वसुली आणि आर्थिक शिस्त
“बँकेने व्यवसायवृद्धीसोबतच वसुलीवरही विशेष भर दिला आहे,” असे डॉ. जालगांवकर यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आपला निव्वळ एन.पी.ए. ०% (Zero Net NPA) राखला असून, ही बाब बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीचा पुरावा आहे.
पारदर्शक कारभार आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन ही या यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षा आणि तंत्रज्ञानाबाबत जालगांवकर यांचे महत्त्वपूर्ण पाऊल
आधुनिक बँकिंगमधील धोके ओळखून डॉ. जालगांवकर यांनी बँकेच्या आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भरीव तरतूद केली आहे.
बँकींग नियमन कायद्यामध्ये झालेल्या बदलांमुळे बँकींग कार्यप्रणालीमध्ये अमुलाग्र बदल झाले असून पारंपारिक बँकींगची जागा आता अधुनिक बँकींगने घेतली असल्याने आय.टी. विभाग हा बँकेचा महत्वपूर्ण घटक बनला आहे.
आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीबरोबरच त्याचे सुरक्षीततेसाठीही बँकांना खूप मोठा खर्च करावा लागल आहे. त्याचा परिणाम हा बँकांच्या नफा क्षमतेवर होत असतानाही, ग्राहकांचे हित लक्षात घेवून बँकेने आपले आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चर व त्याचे सुरक्षीततेसाठी आवश्यक तो खर्च करण्याबरोबरच रु. 5 कोटी रकमेचा सायबर विमा घेवून सभासद, ठेवीदार व ग्राहकांचे ठेवीच्या सुरक्षीततेची अधिक दक्षता घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
त्याचबरोबर रु. 1000 व त्यापेक्षा जास्त रकमेचे भागभांडवल धारण करणा-या व्यक्ती सभासदांचे प्रत्येकी रु. 2 लाखांचे अपघात विम्यापोटी बँकेने रु. 27 लाख 52 हजार तसेच रु. 50 हजार व त्यापेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या सर्व ठेवीदारांचा प्रत्येकी रु. 5 लाखांचा विमा बँकेने उत्तरविलेला असून त्याच्या विम्यापोटी बँकेने रु. 14 लाख 83 हजार इतका खर्च करून बँकेचे सभासद व ठेवीदारांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न संचालक मंडळाने केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. त्याचा लाभ घेण्यासाठी रु. 1000 पेक्षा कमी रकमेचे भाग धारण केलेल्या भागधारक सभासदांनी आपली एका आगाची रक्कम पूर्ण करावी व रु. 50 हजार व त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी बँकेत ठेवून या अपघात विमा योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
त्याचबरोबर ठेवीवर आकर्षक आणि कर्जावर माफक व्याजदर आकारण्याबरोबरच एटीएम, मोबाईल बँकींग, गुगल पे, क्यु.आर. कोड, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी व सि.टी.एस. अशा ऑनलाईन बँकींगच्या विविध सुविधा देवून बँकेने ग्राहकांना घरबसल्या बँकींग सुविधेचा लाभ दिला असून या सर्व योजनांचाही सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दर्जेदार बँकींग सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारी बँक म्हणून या बँकेकडे पाहीले जाते. त्यातून निर्माण झालेल्या विश्वासार्हतेतून व पारदर्शक कामकाजातून बँकेच्या भविष्यकालीन प्रगतीचा आलेख उत्तरोतर उंचावत ठेवण्याचा प्रयत्न यापुढेही सुरु राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्याचा संकल्प
अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी या यशाचे श्रेय संचालक मंडळ, कर्मचारी आणि विश्वासू ग्राहक यांना दिले आहे. “सामाजिक बांधिलकी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या जोरावर बँकेच्या प्रगतीचा आलेख भविष्यातही असाच उंचावत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply