पत्रकार दीपक भागवत यांच्यावर चिपळूणमध्ये हल्ला; १०-१५ जणांवर गुन्हा दाखल, अद्याप कोणालाही अटक नाही

चिपळूण: पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२५ मार्च २०२६ रोजी दुपारी बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी भागवत गेले असता ही घटना घडली.

१० ते १५ लोकांच्या जमावाने “तू कसला पत्रकार?” असे म्हणत भागवत यांना बेकायदेशीररीत्या अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या बॅगेतील ओळखपत्र आणि इतर साहित्याची चोरी केली.

या प्रकरणी दीपक भागवत यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यामध्ये कलम १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १९० (जमावाचा सदस्य असणे), १९१(२) (दंगल घडवणे), ३०३(२) (चोरी), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२) आणि ३५१(३) (गुन्हेगारी धमकी) यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ च्या कलम ४ नुसारही कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बेले करत आहेत. मारहाणीचे चित्रीकरण उपलब्ध असून त्यात हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत असतानाही अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

तपास सुरू असून लवकरच आरोपींना पकडू असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेण्याची मागणी स्थानिक पत्रकारांनी केली असून पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*