सावर्डे येथे अवैध शस्त्रांसह एकास अटक

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे आणि त्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे.

१८ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना, आगवे (ता. चिपळूण) येथील महेश जाधव हा घरामागे अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, घरामागील गोठ्याजवळ एक इसम बंदूक साफ करताना आढळला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. आगवे बौद्धवाडी) असल्याचे सांगितले.

त्याच्याकडे असलेल्या शस्त्राबाबत परवाना विचारला असता, तो नसल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • एक सिंगल बॅरल काडतूस बंदूक
  • एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक
  • ९ जिवंत काडतुसे
    एकूण ७०,९०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल असून, आरोपीविरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३(१) आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*