
दापोली: सेंद्रिय शेती ही भारताची संस्कृती आणि एक शाश्वत विचार आहे. कालौघात परिस्थितीच्या दबावामुळे आपल्याला आधुनिक शेतीकडे वळावे लागले असले, तरी आता पुन्हा या शेतीचे महत्त्व जगाला पटू लागले आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी केले.
गव्हे येथील अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, भरारी दापोली तालुका बचत गट महासंघ आणि दापोली पंचायत समितीचा ‘उमेद’ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या डॉ. स्वामिनाथन सभागृहात आयोजित ‘सेंद्रिय शेती महिला शेतकरी मेळाव्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी बदलापूर येथील कृषिभूषण राजेंद्र भट प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शैलजा अमृते यांनी भूषविले. व्यासपीठावर माजी विस्तार शिक्षण संचालक अशोक निर्बाण आणि भरारी महासंघाच्या उपाध्यक्षा रेश्मा झगडे उपस्थित होत्या.
प्रमुख वक्ते राजेंद्र भट यांनी सेंद्रिय शेतीचे तत्त्वज्ञान आणि इतिहास मांडताना पाणी, वनस्पती व जमीन या तीन घटकांच्या संवर्धनावर भर दिला. निसर्गाकडून जे घेतले तेच पुन्हा निसर्गाला परत केल्यास शेती निश्चितच फायदेशीर ठरते, असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
अस्मिता परांजपे यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात शैलजा अमृते यांनी कम्युनिटी हेल्थ वर्कर म्हणून सुरू झालेला आपला प्रवास आणि अमृते ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. अशोक निर्बाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमती अमृते यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशिका चाचड यांनी मानले.
या मेळाव्याला दर्शना राऊत, प्रियंका रजपूत, मंजुषा डोळस, प्रवीणा गोरीवले, दीपिका राऊत यांच्यासह ‘उमेद’ विभागाचे विशाल लांजेकर, अभिजित भंडारी, अजित ठसाळ, शशिकांत जाधव, अंकुर दुर्ग, रंजना पंदेरे, ज्योत्स्ना डडेमल, पत्रकार श्रेयस खटावकर आणि सुमारे २०० महिला शेतकरी उपस्थित होत्या. उपस्थित पाहुण्यांना सन्मानचिन्ह व रोप देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply