रत्नागिरीत पाणी मीटर चोरणारा साहिल जाधव अटक; घरफोडीचा गुन्हासुद्धा उघड

रत्नागिरी: शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी मीटर चोरीच्या सत्राचा छडा लावण्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.

याप्रकरणी साहिल संजय जाधव (वय २५, रा. फगर वठार, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचे मीटर जप्त करण्यात आले आहेत.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणी मीटर चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. २४ आणि २५ फेब्रुवारी दरम्यान बी.एस.एन.एल. ऑफिस परिसरातून तीन पाणी मीटर चोरीला गेल्याची तक्रार ६ मार्च रोजी दाखल झाली होती.

या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिले होते.

गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित साहिल जाधव याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने बी.एस.एन.एल. ऑफिस परिसरातील ३ पाणी मीटर चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९,००० रुपये किमतीचे तीन मीटर जप्त केले आहेत.

तपासात पुढे आले की, आरोपीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातही (गुन्हा रजि. नं. ३४६/२०२५) सहभाग दर्शवला आहे.

या घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. या कारवाईत सागर शिंदे, दीपक साळवी, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर आणि अमित पालवे यांनी सहभाग घेतला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*