रत्नागिरीत रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगार जखमी

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) असलेल्या डॉ. खान इंडस्ट्रियल कन्सलटंट्स (डीकेआयसी) या केमिकल कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला.

या दुर्घटनेत ११ जण जखमी झाले असून त्यामध्ये बहुतांश कामगारांचा समावेश आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी झालेल्या सर्व कामगारांना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळासह रुग्णालयाला भेट दिली.

यावेळी त्यांनी जखमी कामगारांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. ही कंपनी प्रामुख्याने स्टील, कापड, रंग आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी लागणारी वैशिष्ट्यपूर्ण सिलिका आधारित रसायने तयार करते.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*