कोरोना विषाणूचा उद्रेक झाला त्या स्थितीत संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन अर्थात टाळेबंदी जाहीर करण्याची वेळ आली. आलेले हे संकट ना भुतो न भविष्यती अशा प्रकारचे होते. या लॉकडाऊनचा परिणाम थेट सर्वांच्या रोजगार आणि व्यवसायांवर झाल्याचे दिसून आले.
अशा स्थितीत हातावर पोट असणाऱ्या सर्वांची स्थिती अधिक बिकट होती. अशा सर्वांच्या मदतीला साथ मिळाली ती शिवभोजन थाळी योजनेची.
राज्यात सत्तेवर येताना 10 रुपयांमध्ये गरिबांना जेवण पुरवणारी नाविण्यपूर्ण अशी योजना सुरु करण्यात आली होती. ज्यांना उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही अशा गरिबांसाठी ही योजना राज्यात सुरु करण्यात आली होती.
गरिबांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था ती देखील अत्यंत माफक दरात देणारी ही शिवभोजन थाळी योजना आरंभापासून सर्वांना आधार ठरलेली आहे.
टाळेबंदीत हाताला काम नाही अशा स्थितीत यात अधिक सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि 10 रुपयांना असणारी ही थाळी 5 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली.
योजना सुरु झाली त्यावेळी रत्नागिरी जिल्हयात 3 ठिकाणी शिवभोजन थाळी योजना केंद्र सुरु करण्यात आली होती.
मात्र लॉकडाऊन दरम्यान इतरांच्या प्रांतात स्थलांतरासाठी जाणारे मजूर आणि ज्यांचे व्यवसाय पूर्ण ठप्प झाले अशांची संख्या वाढली आणि अधिक ठिकाणी ही सुविधा असावी अशी मागणी येताच शासनातर्फे याचा विस्तार तालुक्यांच्या ठिकाणीही करण्याचा निर्णय घेतला.
शासनाची परवानगी प्राप्त होताच जिल्हयातील 9 तालुक्यांच्या ठिकाणांसह 20 शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आली.
22 मार्च नंतर सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाल्याने अतिशय गतीमान पध्दतीने निर्णय घेऊन या सर्व ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध झाल्याने या कठीण काळात गरिबांना या योजनेचा मोठा आधार झाला.
1 एप्रिल पासून आतापर्यंत या 20 केंद्रावर 5 रुपयात शिवभोजन थाळी मिळत आहे. अशा साधारण 3 हजार थाळयांच्या माध्यमातून हातावर पोट असणाऱ्या सर्वांना या माध्यमातून भोजन मिळत आहे. जिल्हयात या अंतर्गत आतापर्यंत 3 लाख 50 हजार थाळयांचे वाटप झाले आहे.
वाटीभर वरण, एक भाजी, भात आणि चपाती या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दिली जाते. कोरोना विषाणूच्या या उद्रेकाच्या काळात अन्न उपलब्धता आणि सकस अन्न या निमित्तने जिल्हयात गरजू आणि गरीब जनतेला देण्याचे काम शिवभोजन थाळी योजनेच्या रुपाने सुरु आहेत.
कोरोनाची ही आपत्ती गंभीर असली तरी सरकार अतिशय खंबीर असून राज्यात शेवटच्या व्यक्तींपर्यंत हे खंबीर पाठबळ या निमित्ताने देण्यात येत आहे हे येथे उल्लेखनीय आहे.