रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दिवा पॅसेंजरमध्ये युवतीच्या विनयभंग केल्या प्रकरणी पिडीतेचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून संशयित इफराज इंतीखाब अलजी याचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला आहे.

22 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून खेड येथील लॉ कॉलेज येथे शिक्षण घेणेसाठी जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला होता.

यावेळी सकाळी ५.१५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभ्या असलेला दिवा पॅसेंजर रेल्वेमधील डब्यामधे ही युवती बसलेली असताना आरोपी इफराज इंतीखाब अलजी (रा. कुरधुंडा, संगमेश्वर) याने पीडितेच्या पाठीमागून येऊन तिची मान जबरदस्ती त्याच्याकडे वळऊन किस करून विनयभंग केला.

या प्रकाराला पीडित मुलीने जोरदार विरोध केल्याने आरोपी तेथून पळून गेला. मात्र फिर्यादी पीडित मुलीने तत्काळ पोलीसांकडे संपर्क केला असता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला चिपळूण रेल्वे स्टेशन येथे अटक करण्यात आली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(2), 78 प्रमाणे रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि ७१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची आज रोजी न्यायालयात सुनावणी झाली, सदर कामी पीडित मुलीच्या वतीने सरकारी वकिलांना मदत करणेसाठी खाजगी वकील ॲड. मनिष नलावडे हे हजर होऊन आरोपी याचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून गंभीर गुन्हाचे असल्याचा युक्तिवाद करून आरोपी जामीनावर सुटल्यास साक्षीदार यांचेवर दबावआणू शकतो व त्यामुळे केसवर विपरीत परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे दाखले देऊन आरोपी याचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये, असा जोरदार युक्तीवाद केला.

सरकारी वकील ॲडव्होकेट अनिरुद्ध फणसेकर यांनी देखील गुन्हाचे स्वरूप गंभीर असून, कोणतीही ओळख नसताना आरोपी याचे पीडित मुली सोबतचे कृत्य गंभीर स्वरूपाचे कृत्य असल्याचा आरोप करून, केस जलद गतीने चालवून निकाली करण्याचे आदेश करण्यात यावे, असा युक्तीवाद फिर्यादी तर्फे केला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  एस.एस.गोसावी यांनी आरोपी व फिर्यादी यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी इफराज इंतीखाब अलजी याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.