दापोली: दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्षा ममता बिपीन मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

ममता मोरे यांच्यावर नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा वेळेवर न घेणे, सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करताना सदस्यांना विश्वासात न घेणे, सभेचे कामकाज विहित पद्धतीने न चालवणे अशाप्रकारे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ अन्वये त्यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी अविश्वास ठराव दाखल करावा, असा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दापोली प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.

या आदेशानुसार, दापोली नगरपंचायतीच्या नगरसेवकांना १३ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता दापोली प्रांताधिकारी कार्यालयात हजर राहून लेखी खुलासा सादर करण्याबाबतचे पत्र प्रांतांकडून देण्यात आले आहेत.

तसेच, या संदर्भातील उपलब्ध पुरावे सादर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

दापोली नगरपंचायतीच्या राजकीय वर्तुळात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.