रत्नागिरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ‘मिशन माणुसकी’ या संस्थेतर्फे तीन दिवसांचा विचार-साहित्य-कला जागर करून केली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

या ऑनलाईन जागर महोत्सवात अभिनेत्री रत्ना पाठक-शहा, ज्येष्ठ विचारवंत पत्रकार पी. साईनाथ, अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. बाबुराव गुरव, लोकशाहीर गदर, सामाजिक भाष्य कविताकार रामदास फुटाणे आदी नामवंत सहभागी होणार आहेत.

३० जुलै, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत ‘मिशन माणुसकीच्या’ फेसबुक पेजवरून या महोत्सवाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येईल.

३० जुलैला संध्याकाळी ६ वा. रत्ना पाठक-शहा वर्तमान सांस्कृतिक स्थितीवर भाष्य करून ‘अण्णाभाऊ जागरचे’ उदघाटन करतील. तर स्थलांतरित मजुरांचे देशवास्तव पी. साईनाथ मांडणार आहेत.

३१ जुलैला रामदास फुटाणे कवी संमेलनाचे उदघाटन करणार असून अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, नीरजा, प्रज्ञा दया पवार, विजय चोरमारे, भगवान निळे आदी कवी राजकीय सामाजिक आशयाच्या कविता सादर करतील. डॉ. महेश केळुसकर या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

१ ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. या दिवशी लोकशाहीर गदर यांनी ‘शाहिरी जलसा’चे उदघाटन केल्यावर एल्गार सांस्कृतिक मंचाच्या वतीने लोकशाहीर संभाजी भगत, शाहीर निकम आणि शाहीर संजय जाधव जलसा सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या व्यक्तींशी संपर्क करू शकता. मारुती शेरकर, 9867708408 अल्लाउद्दीन शेख, 8080454555 प्रवीण जठार, 9833775814.

– माय कोकण