रत्नागिरी : कोकण रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यातील आयात-निर्यात क्षेत्राला मोठी भेट दिली आहे. आता रत्नागिरी रेल्वे स्थानकातून थेट जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) बंदरात मालाची निर्यात करणे शक्य झाले आहे.

गद्रे मरीन एक्सपोर्टच्या २० वातानुकूलित मिनी कंटेनर रेकच्या पहिल्या खेपेने या ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्पादने जगभरात निर्यात होतात, तसेच अनेक उत्पादने आयातही होतात.

यापूर्वी, निर्यातदारांना गोव्यातून रेकमधून माल पाठवावा लागत असे, ज्यामुळे वेळ आणि खर्च अधिक लागत असे.

मात्र, कोकण रेल्वेने आता रत्नागिरीतच स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक यंत्रणा उभारली आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, गद्रे मरीन एक्सपोर्टचे संचालक अर्जुन गद्रे, कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुविधा आणि फायदे:

  • रत्नागिरी रेल्वे स्थानकात विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे.
  • कोकणातील मासे आणि फळ प्रक्रिया उद्योगांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
  • आयात-निर्यातदारांना आता गोव्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • वेळ आणि खर्चात बचत होणार आहे.

कोकण रेल्वेचे आवाहन:
कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी कोकणातील आयात-निर्यातदारांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कोकण रेल्वे आयात-निर्यातदारांना परिपूर्ण सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.