दापोली : अनेक वर्षे प्रलंबित असलेला हर्णे जेट्टीचा विषय मार्गी लागला असून नुकतंच जेटीच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कनकदुर्ग किल्ल्याच्या बाजूने काम सुरू करण्यात आलं आहे. ४० वर्षांपूर्वी मंजूर झालेलं हर्णे जेट्टीचं काम लाल फितीत अडकलं होते.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2025/02/img_20250206_0747546895129025809699537-1024x683.jpg)
यासाठी स्थानिक तसेच जिल्हाभरातील मच्छीमार बांधवांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र गेली अनेक वर्ष त्यांच्या या लढ्याला यश येत नव्हतं.
अखेर दापोलीचे तत्कालीन आमदार व विद्यमान गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, खा. सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यानंतर या कामाला गती प्राप्त झाली.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2025/02/img_20250206_0916305824921583492372008-1024x683.jpg)
आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने येथील मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
या जेटीचे काम हे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून होत असून ४० वर्षांचं स्वप्न साकार होत असल्याने हर्णे बंदर सुसज्ज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोकण किनारपट्टीवर असलेल्या हर्णे बंदरामध्ये रोजची कोट्यावधींची उलाढाल होत असते. या बंदरातून देशा कोट्यावधी रुपयांचं परकीय चलन मिळत आहे.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2025/02/17388080930518424057372191690494-1024x462.jpg)
परंतु पारंपरिक मासेमारी बंदरात मच्छीमार जेट्टीचा अभाव असल्याने इथल्या मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
ही आम्हा मच्छीमार बांधवांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे, अशा प्रतिक्रीया मच्छीमारांकडून येत आहेत.
४० वर्षांची जेटीची मागणी आता पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जेट्टीचं पाहिलेले स्वप्न साक्षात उतरत असल्याची भावना मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे.
निव्वळ जेट्टी अभावी येथील मच्छीमारांनी अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. अनेक वादळ
वित्तहानी तर झालीच आहे, परंतु जीवितहानी देखील झाली आहे.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2025/02/img_20250206_0914124351009937186483236-1024x683.jpg)
जेट्टी नसल्याने मच्छीमारांना आपल्या मासळी उद्योगामध्ये अद्ययावत होता येत नव्हतं. येथील मच्छीमार अजूनही पारंपरिक मासेमारीवरच अवलंबून आहे.
आजूबाजूच्या बंदरांमधील मच्छीमारांनी अद्ययावत सुविधांचा वापर करून मासेमारी उद्योग वाढवायला सुरुवात केली.
परंतु आता हर्णे बंदरामध्ये सुसज्ज जेटी उभारली जात असून आता मच्छीमारांमध्ये व्यवसाय वाढविण्यास मदत होईल, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.