खेड:- मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर वन उपज नाक्यावर खैराची सोलीव लाकडं आणि दोन ट्रक असा 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गेल्या महिन्यात पोलादपूर वन उपज नाक्यावरून एका ट्रकमधून लाखो रुपयांची खैर अर्काची तस्करी बिनबोभाटपणे महाडकडे रवाना होताना पकडण्यात आली होती.

मात्र, यावेळी पोलादपूर वन उपज नाक्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच आरोपीही ताब्यात घेतले असल्याची माहिती वनपाल पोलादपूर बाजीराव पवार यांनी दिली.

रोहे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक रोहित चौबे आणि आरएफओ महाड राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वनउपज तपासणी नाका – पोलादपूर येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना चिपळूणच्या दिशेने जाणारी वाहने क्र. एमएच 41-एयु-7083 व एम एच43-बीबी-0733 ची तपासणी स्थानिक वनविभागाचा स्टाफ यांनी केली असता सदर वाहनांमध्ये खैर सोलीव तुकडे – 182 नग किंमत 52 हजार 802 रूपये किंमतीचा बिनपासी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी वाहनचालक राफेबिन सलाम मोहम्मदी, शेख वाहिद शेख सलीम व अबुबकर अब्दुल मस्जिद, अदनान अहमद अकील अहमद, मोमीन मसूद अख्तर अतीक अहमद सर्व रा.ता.मालेगाव जि. नाशिक असे एकूण 5 इसम यांचे विरूध्द कारवाई करून अंदाजे 12 लाख रु. किमतीची दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली.

सदर कारवाई करण्यामध्ये स्थानिक स्टाफ वनपाल पोलादपूर बाजीराव पवार, गोविंद खेडकर, देविदास त्रिभुवन – वनरक्षक तपासणी नाका, नवनाथ मेटकरी, संदीप परदेशी, अमोल रोकडे, भीमराव गायकवाड हे सामील होते.