कोकण आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची कारवाई

दापोली :  तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच परस्परांना अपात्र ठरविण्यासाठी संघर्ष करत होते. या कायदेशीर लढाईत उपसरपंच रऊफ काझी यांची सरशी झाली आहे. सरपंच रविंद्र घाग यांना कोकण विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे.

या पूर्वी सरपंचांनी उपसरपंच काझी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.

त्यामुळे अडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांमधील गेल्या ३ वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.

सरपंच रविंद्र घाग आणि उपसरपंच रऊफ काझी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून जोरदार राजकीय संघर्ष सुरु होता.

सरपंच मनमानी कारभार करतात, विविध दाखले देण्याचे ग्रामसेवकाचे अधिकार डावलून स्वतः च्या अधिकारात दाखले देतात.

सरपंचांच्या अशा या नियमबाह्य कामांची चौकशी व्हावी, यासाठी ३वर्षांपूर्वी उपसरपंच काझी यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली.

गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला होता.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही न झाल्याने उपसरपंचांनी स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी उपोषण केले.

त्यावेळी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपसरपंचांनी उपोषण सोडले होते.

कोकण विभागीय आयुक्तांकडे सरपंचांचा चौकशी अहवाल गेला. सरपंचांच्या प्रशासकीय कामात अनियमितता झाली असल्याने दिसून येत असल्याचे नमूद करत सरपंच रविंद्र घाग यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये अडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंचांना त्यांच्या पदावरून बाजुला करण्यात आले असल्याचे निकालात म्हटले आहे.