वाशी : मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, मराठी बाणा अशा उत्तमोत्तम कार्यक्रमांचे निर्माते अशोक हांडे आंबा व्यावसायिक म्हणून खूपच कमी जणांना परिचित असतील; पण ते गेल्या ४० वर्षांपासून या व्यवसायात आहेत. आंबा मार्केटमध्ये कमी झालेला मराठी टक्का वाढवण्यासाठी मराठी माणसानेच मानसिकता बदलावी असं ते परखडपणे म्हणाले.

संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा

महाराष्ट्र दिनी 9प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओ पॉडकास्टमध्ये प्रख्यात youtuber अमोल परचुरे सोबत संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.

आंबा व्यापार नेमका कसा होतो? ग्राहकांचे आणि खवय्यांचे आंब्याच्या बाबतीत कोणते गैरसमज आहेत? दलालांची भूमिका काय असते? देश-विदेशातील आंब्याच्या जाती कोणत्या? पाकिस्तानचा आंबा दुबईमध्ये का प्रसिद्ध आहे ? अशा अनेक विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कशेडी घाटातील बोगदा असेल किंवा कोस्टल रोड सारखे प्रकल्प, ही कामं लवकरात लवकर झाली तर दरवर्षी होणारी आंब्याची आवक वाढेल आणि आंबा खराब होण्याचं प्रमाणही कमी होईल, म्हणूनच सरकारदरबारी यासाठी बरीच निवेदनं पाठवूनही निराशाच पदरी पडते असंही त्यांनी सांगितलं.

कोकणात आंबे काढायला स्थानिक कामगार मिळत नाहीत आणि APMC मध्ये उत्तर प्रदेश-बिहारमधले लोकं या व्यवसायात ठाण मांडून बसलेत हे रोखठोक बोलतानाच त्यांनी आंबा व्यापारातल्या खाचा-खोचा आणि सेलिब्रिटींना आंबे पुरवण्याचे भले-बुरे किस्सेही अगदी बिनधास्तपणे सांगितले.

गेल्या काही वर्षात मराठी तरुणांनी ऑनलाईन माध्यमातून आंबे विकण्याचा चांगला प्रयत्न सुरु केल्यानं आश्वासक वाटत असल्याचंही ते म्हणाले. ‘हमाल दे धमाल’ आणि ‘शेम टू शेम’ या चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर चित्रपट व्यवसाय का सोडला, याची कारणंही अशोक हांडे यांनी सांगितली.

मराठी नाट्य-निर्मात्यांनी पदरमोड करून मराठी नाट्य-व्यवसाय जिवंत ठेवलाय हे सांगतानाच काही नाट्य-निर्मात्यांच्या द्वेषपूर्ण वागण्यावर त्यांनी खास ‘हांडे’ शैलीत प्रहार केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदिप्यमान चरित्रावर आधारित भव्य-दिव्य कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा मानस त्यांनी या पॉडकास्टमध्ये व्यक्त केला. हा दिलखुलास संवाद युट्यूबवर अमोल परचुरे यांच्या ‘कॅच अप’ या शोमध्ये तुम्ही बघू शकता.