रत्नागिरी : दापोलीतील राम भक्ताने 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी हत्तीवरून साखर वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दापोलीतील प्रतिथयश व्यवसायिक, जालगावचे सरपंच आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय श्रीधर फाटक यांनी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी 22 जानेवारीला हत्तीवरुन साखर वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

जालगाव ग्रामपंचायत हद्दीबरोबरच दापोली शहरात देखील साखर वाटप करण्यात येणार आहे. केरळहून हत्ती दापोलीच्या दिशेनं निघालेलं आहे. 21 जानेवारीपर्यंत हत्ती दापोलीत पोहोचेल असा अंदाज आहे.

दिवंगत श्रीधर फाटक

अक्षय श्रीधर फाटक यांचे वडील रामभक्त आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी होते. अयोध्येत श्रीराम जन्मभूमिवर राम मंदिर उभे राहिले की, मी गावात हत्तीवरुन साखर वाटेन असे त्यांचे वडील नेहमी सांगत असत.

दुर्दैवाने आज ते या जगात नाहीत. मात्र त्यांच्या स्वप्नाची पूर्तता त्यांचे चिरंजीव अक्षय श्रीधर फाटक यांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षय फाटक हे 22 जानेवारीला दापोलीत हत्तीवरुन साखर वाटणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे.

Advertisement