खेड : – तालुक्यातील आवाशी येथे दि.१६/११/२०२३ रोजी सकाळी पहाटे ४.०० ते ५.०० चे सुमारास मौजे आवाशी गावाच्या हद्दीमध्ये मुंबई गोवा हायवे क्र. ६६ वर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या सांबराचा मृत्यू झाला आहे.

अपघातात हायवेवर वन्यप्राणी असल्याचे निदर्शनास आल्याने सचिन खोपकर यांनी सकाळी ७.०० वा स्थानिक वन अधिकारी यांना दुरध्वनी द्वारे कळविले.

वनविभागाला ही बातमी प्राप्त होताच ७.३० चे दरम्यान घटनास्थळी दापोलीचे वनक्षेत्रपाल पी. जी. पाटील व वन कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता सांबर मृतावस्थेत दिसून आला.

मृत्यू पावलेला सांबर हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय ७ ते ८ वर्ष असावे, वाहनाचा जोरदार धक्का बसल्याने सांबर मृत झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले.

त्याच्या तोंडाला मार लागून रक्त येत होते तर पाठीमागील उजव्या पायावरती खरचटलेल्या खुणा दिसून आल्या.

मृत सांबर ताब्यात घेवून पशुवैद्यकिय अधिकारी खेड यांजकडून तपासणी केली असता. ही घटना सकाळी पहाटे चार ते पाच च्या सुमारास घडली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

या घटनेबाबत वनक्षेपाल दापोली यांनी अज्ञात वाहन व वाहनचालकाविरूध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे.

या अपघाताचा तपास विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरीजा देसाई (अतिरिक्त कार्यभार) व सहाय्यक वनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार) वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. जी. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, पुढील तपास करीत आहेत.

यावेळी वनपाल खेड सुरेश उपरे, वनरक्षक काडवली अशोक ढाकणे, वनरक्षक आंबवली प्रियांका कदम, वनरक्षक तळे परमेश्वर डोईफोडे, वनरक्षक खवटी रानबा बर्गेकर उपस्थित होते.

मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्या करता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल दापोली यांनी केले आहे.

रात्रीच्या वेळी प्रवास करताना वहाने सावकाश चालवावे असे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे . पी. जी. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली – ७४९९५७५७८९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.