रत्नागिरी:- मागील बारा वर्ष कोकण पदवीधर मतदार संघात जे आमदार कार्यरत आहेत, त्यांनी पदवीधरांसाठी काही ठोस केलेले नाही.

त्यांना पदवीधरचे आमदार म्हणण्याऐवजी नुसतेच आमदार म्हणायला हवे असे आरोप मविआचे उमेदवार रमेश कीर यांनी केले.

महाराष्ट्र शासन फक्त जनतेला आश्वासने देत आहे, राज्यात 80 टक्के पदवीधर तरुण बेरोजगार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पदवीधर आमदारांचे काम हे रस्ते विकास किंवा अन्य विकास कामे करणे नसून, पदवीधर, शिक्षण, बेरोजगार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

पदवीधरांसाठी काहीही ठोस काम डावखरे यांनी केलेले दिसून येत नाही. कोकणात पदवीधर मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. रोजगारीसाठी अन्य जिल्ह्यात जावे लागत आहे.

त्यामुळे शासकीय पातळीवरील भरतीत येथील बेरोजगार तरुणांसाठी वेगळा निकष असणे आवश्यक आहे. येणार्‍या उद्योग व्यवसायांमध्ये स्थानिकांच्या समावेशासाठी वेगळी भूमिका हवी.

जुन्या पेन्शनसाठीही आपण आग्रही राहणार असल्याचे रमेश किर यांनी सांगितले.

कोकण बोर्ड मागील 13 वर्षात राज्यात प्रथम येत आहे. याठिकाणी गुणवत्ता ठासून भरलेली आहे. परंतु येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह अन्य परीक्षांसाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जावे लागते.

त्यामुळे कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा म्हणून प्रयत्न होणे आवश्यक आहे. येथील युवा वर्गाला स्पर्धा परीक्षांचा प्लॅटफॉर्म मिळणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रांना भेटी देऊन रोजगाराची संधी जास्त मिळावी यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे असल्याचे मत रमेश किर यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याचा फटका ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांना बसण्याचा धोका अधिक आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण संस्था बंद पडतील व ग्रामीण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहील अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

सध्या शासन आपल्या जबाबदार्‍यांमधून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असून, युजीसी अंतर्गत स्वायत: देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या या भागात काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण पदवीधर हा मतदार संघ पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पसरला आहे.

मागील सहा ते सात महिन्यांपासून आपण प्रयत्न करीत असल्याचेही रमेश किर यांनी सांगितले.