दापोली – दापोली येथील समुद्रात ६ जण बुडाल्याची घटना आज घडली आहे. सुदैवानं यामधील बुडणाऱ्या ५ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. यामधील एकजण अद्याप बेपत्ता आहे.

रविवार सुट्टी असल्याने दापोली तालुक्यातील कर्दे येथील समुद्राचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पर्यटक आले होते. या ठिकाणी फिरत असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही.

समुद्रामध्ये स्नान करत असताना सर्वजण समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. समुद्रात बुडताना त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. स्थानिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाच जणांना वाचवलं. मात्र त्यातील एक जण सापडला नाही. त्याचा शोध घेण्यात येत आहे. अद्यापपर्यंत त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

दरवर्षी दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी अशा घटना होत असतात. वारंवार पर्यटकांना मनाई करून देखील स्थानिकांचे ते पाण्यामध्ये उतरतात. पाण्याचा अंदाज नसल्यामुळे अनेकदा पर्यटक बुडून मृत्युमुखी पडतो.

या वेळेला सुद्धा अशीच घटना दापोली तालुक्यातील कर्दे इथं घडली आहे. सहा जण पाण्यामध्ये उतरले आणि बुडू लागले. स्थानिक नसते तर या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकला असता. तरीदेखील एक जण अद्यापही बेपत्ता आहेच.

समुद्रकिनारी धोक्याचा इशारा देणारे सूचना फलक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे हे योग्य नव्हे. सूचनाफलक लोकांना सतर्क करण्यासाठी असतात, त्या अंमलात आणा, असं इथल्या लोकांनी सांगितलं.