दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी जमाती मोहल्ला येथे – क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी रोजी रात्री अचानक पाऊस पडल्यामुळे रिजवान हुस्सैनी यांच्या घरामध्ये पाणी साचले होते. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रिजवान हुस्सैनी पुढील दरवाजातून पावसाचे पाणी बाहेर काढत होत्या. तेव्हा पाणी शेजारी असलेल्या घराच्या शौचालयाच्या दारासमोरून वाहून जात होते. याचा राग मनात धरून अब्दुल रहमान हुस्सैनी व रियाना हुसैनी हे रिजवाना हिला मारण्यासाठी धावून गेले. या घटनेची माहिती जमातीचे नेते यांना सांगण्याकरिता रिजवाना हुस्सैनी गेल्या होत्या. तेव्हा साहिल हुस्सैनी, सलमान हुसैनी, कमाल हुस्सैनी, अब्दुल रहमान हुस्सैनी, जिनात हुस्सैनी (सर्व राहणार जमाती मोहल्ला बुरोंडी) यांनी रिजवाना हिच्या घरात शिरून घरात असणाऱ्या महेक हुस्सैनी हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. ही भांडणे सोडविण्याकरिता रिजवाना मध्ये गेली असता तिलादेखील मानेला धरून बाजूला केले. याप्रकरणी रिजवाना यांनी दापोली पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार हळदे करीत आहेत.