देवरुख: शहरातील कांजिवरा भागातील नुरुल होदा मशहूरअली सिद्दिकी (४६) यांच्या घरात घुसून अज्ञात चौघांनी ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज पहाटे ३ वाजता घडली. याबाबतीत देवरुख पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनुसार, चार अनोळखी इसमांनी नुरुल यांच्या घरात मागील बाजूने प्रवेश करत सर्वाना लाथा बुक्क्यानी मारहाण केली. यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून बेडरुममधील कपाटे फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे मिळून ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हे करत असताना संबंधित सर्वाना आरोपींनी दोरिने बांधून ठेवले. चोरी केल्यानंतर दोन दिवसांत पाच कोटी रुपये खंडणी दे नाहीतर तुझ्या मुलाला ठार मारू, अशी धमकी देत सगळे पसार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यानुसार देवरुख पोलिस ठाण्यात भा. दं. वि. क. ३९४ , ३४२, ३८४, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९चे कलम ३/२५अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश कानडे, गुन्हा अन्वेशण विभागाचे हेमंतकुमार शहा, देवरुख पोलीस निरिक्षक मारुती जगताप आदी घटनास्थळी दाखल झाले. आज दुपारी श्वान पथक व ठसे तज्ज्ञही घटनास्थळी गेले होते.