चिपळूण: औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चिपळूणतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित पाच दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर मौजे कोळकेवाडी येथील प्रयोगभूमी शिक्षण केंद्रामध्ये संपन्न झाले.
२४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या या शिबिरात ३० विद्यार्थी आणि ५ शिक्षकांनी सहभाग घेतला.

शिबिराचे उद्घाटन महानिर्मिती पोफळीचे शाखा अभियंता अनिल मलमे यांच्या हस्ते झाले.
या वेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिपळूणचे प्राचार्य प्रीतम शेट्ये, उपप्राचार्य विजय वानखडे, प्र. गटनिदेशक, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी समीर पाणींद्रे आदी उपस्थित होते.
शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध कामांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये शेततळ्यातील गाळ काढणे, धावण्याचा मार्ग तयार करणे, शौचालयाला रंग देणे, रस्त्याचे रुंदीकरण करणे, विद्युत जोडणीचे काम करणे, विद्युत प्रकल्पातील गाळ काढणे आदी कामांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी दररोज पाच तास शारीरिक श्रम केले. यासोबतच दररोज एक तास बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्रा. डी. आर. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसिद्ध साहित्यिक अरुण काकडे यांनीही शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संध्याकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना अरुण काकडे म्हणाले, “प्रयोगभूमी हे ऊर्जेचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला ऊर्जा मिळते. या शिबिरातून भारतीय संविधानाची मूल्ये रुजवली जातात.”
प्राचार्य प्रीतम शेट्ये यांनी प्रयोगभूमीच्या कार्याचे कौतुक केले. उपप्राचार्य विजय वानखेडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाचे महत्त्व स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभव सांगितले. समीर पाणींद्रे यांनी आभार मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिजीत कडवईकर, ओंकार देवळेकर, राजेंद्र चव्हाण, संतोष मोहिते, शशिकांत काणेकर, रोशन नासरे, शैलेश ओमासे, शिवाजी झोरे, मंगेश मोहिते, रेखा मोहिते, स्नेहा मांजरेकर आदींनी विशेष प्रयत्न केले.