रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
रत्नागिरीतील साक्षी संदीप पावसकर (वय 26) आणि रुचा प्रमोद खेडेकर (वय 21) यांच्यासह सिंधुदुर्गातील 6 नातेवाईक 20 एप्रिल रोजी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. हे सर्वजण आज, 23 एप्रिल रोजी रात्री मुंबईत पोहोचणार आहेत.
शिरगाव, रत्नागिरी येथील खलिफ मुकादम आणि त्यांचे कुटुंब (एकूण 6 सदस्य) 20 एप्रिल रोजी अमृता ट्रॅव्हल्समार्फत काश्मीरला गेले होते. हे पर्यटक सध्या श्रीनगर येथील हॉटेलमध्ये सुखरूप असून, 25 एप्रिल रोजी विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत.
रत्नागिरीतील मनोज जठार, अनुश्री जठार यांच्यासह 32 अन्य सदस्य (एकूण 34) 21 एप्रिल रोजी श्री टुरिझममार्फत काश्मीरला गेले होते. हे सर्व पर्यटक सध्या कटरा, जम्मू येथे सुखरूप आहेत. ते उद्या, 24 एप्रिल रोजी रेल्वेने दिल्लीला पोहोचणार असून, 26 एप्रिल रोजी रत्नागिरीत परततील.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला असून, ते सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.