मुंबई -देशभर गुरुवारपासून (१ एप्रिल) ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोहिमेत साधारण ४० लाख नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिके मार्फत दोन सत्रांत लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत उद्दिष्टाच्या साधारण २० टक्केच लसीकरण झाले असून आतापर्यंत १० लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत ४५ वर्षांवरील निरोगी नागरिकांची संख्या साधारण ४० लाख आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेत गुरुवारपासून या नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता दोन सत्रात ही मोहीम राबवण्यात येणार असून सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या लसीकरणाची एकूण १०८ केंद्रे असून त्यापैकी २९ पालिके ची, राज्य व केंद्र सरकारची १३ आहेत. त्याचप्रमाणे ५९ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी आहे. याशिवाय आणखी २६ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या दररोज सरासरी ४० ते ४५ हजारपर्यंत कोविड चाचण्या होत आहेत. ही संख्या दर दिवशी लाखांपर्यंत नेण्याचे पालिके चे प्रयत्न आहेत.


लशीचा साठा पुरेसा
लशीचा पुरवठा सुरळीत होत असून सध्या मुंबईत २ लाख मात्रा उपलब्ध आहेत. दिवसाला ४० हजार लोकांचे लसीकरण के ले जात आहे. ४५ वर्षांवरील सर्वांना लस द्यायची असल्यास लशीचा साठा योग्य प्रमाणात असून लस देण्याचीही तयारी झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.