जालना – या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ३० हजार कोटी रुपये अधिक तरतूद आहे. राज्यासह देशातील विकासविषयक कामांना यामुळे चालना मिळणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक लाख सात हजार कोटींची तरतूद होती. या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद एक लाख ३७ हजार कोटी आहे. देशभरातील सुरू असलेले रेल्वे प्रकल्प त्याचप्रमाणे मार्गाचे दुहेरीकरण, स्थानकांचा विकास, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण इत्यादींसह नवीन विकासविषयक कामांसाठी यामधून निधी मिळणार आहे. २०१४ पासून सरकारने कर वाढविले नसल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगारांसह उद्योगांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. करोनाकाळात जगातील अर्थव्यवस्था कोलमडली असतानाही आपल्या देशाने या संदर्भात प्रगती केली असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.