रत्नागिरी:- रेल्वेत तरुणीचा विनयभंग करुन तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या राजेश महेश्वर सिंग (वय २२, रा. छत्तीसगड) या तरुणाला येथील न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासासह दोन हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली.

पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती दि. १८ मार्च २०२० रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने गोव्याहून ठाणे येथे आपल्या बहिणी सोबत जात होती.

याच दिवशी गाडी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकातून पुढे जात असताना पिडीतेची बहिण स्वच्छतागृहात गेली होती. तर पिडीता बाहेरील मोकळ्या जागेत उभी होती.

याच संधीचा फायदा घेत राजेश सिंग याने पिडीतेचा विनयभंग करत तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे पिडीता गोंधळून गेली होती.

ठाणे येथे रेल्वेतून उतरल्यानंतर तिने नजिकच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता.

पोलीसांनी चौकशीनंतर राजेश सिंग याच्या विरुद्ध भादंविक ३५४ अ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राजेश सिंग याला अटक करुन त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

खटल्याची सुनावणी पुर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राजेश सिंग याला तीन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रु, दंड, दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा ठोठावली.

गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील यांनी केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. विद्यानंद जोग, अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले.

पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनंत जाधव तर मदतनीस म्हणूण महिला पोलीस नाईक संजिवनी मोरे यांनी काम पाहिले.