संशयीत गोहत्ये प्रकरणी गुहागर पोलीसांची कारवाई

वेगवान कारवाई न करू शकणाऱ्या दाभोळ पोलीसांची चौकशीची मागणी


दाभोळ : दापोली तालुक्यातील नवसे गावातील ५० दिवसांपूर्वी घडलेल्या संशयीत गोहत्ये प्रकरणी तिघांना गुहागर पोलीसांनी अटक केली आहे. मांसाच्या नमुन्या अहवाल मात्र अद्यापही प्रलंबीत आहेत. त्यामुळे मांस नक्की कशाचं आहे याचा पुरावा उपलब्ध होऊ शकलेला नाहीये.

या प्रकरणी दाभोळ पोलीसांना जे जमलं नाही ते गुहागर पोलीसांनी करून दाखवलं आहे. गुहागर पोलीसांनी हुजूर नाखवा (५१), शफाकत मुजावर (३९) आणि आरिफ मुरूडकर (४३) या तिघांवर अटकेची कारवाई केली. हेच दाभोळ पोलीसांना का जमलं नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान गुहागर पोलीसांनी अटक केलेल्या या तिघा संशयीत आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

अत्यंत संवेदनशील प्रकरणी दाभोळ पोलीसांनी दाखवलेल्या थंड कारभारा विषयी काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत थेट पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षकांनी याची तातडीनं दखल घेत तपास गुहागर पोलीसांकडे सोपवला. गुहागर पोलीसांनी झपाट्यानं तपास करत वेगवान कारवाई करत तिघांना अटक केली. दाभोळ पोलीसांनी या प्रकरणी का ढिसाळपणा दाखवला? यामागे काय करण होतं? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. दाभोळ पोलीसांनी गांभीर्य न दाखवल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*