दापोली : 17 फेब्रुवारी 2025 रोजी दापोली तालुक्यातील कुंभवे गावात रानकोंबड्याची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुंभवे येथील एका घरात दोन व्यक्ती रानकोंबड्याची शिकार करून आले होते.

वन अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर रुपेश झाडेकर यांच्या पडवीमध्ये तपासणी केली असता, नितीन शांताराम झाडेकर (वय 34, रा. कुंभवे) आणि आशिष अशोक पेडमकर (वय 32, रा. वाकवली) हे दोघे जखमी रानकोंबडा आणि छऱ्याची बंदूक घेऊन आढळून आले.

या दोघांनाही ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गिरिजा देसाई (विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी), प्रियंका लगड (सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील (परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली), रामदास खोत (वनपाल दापोली), शुभांगी भिलारे (वनरक्षक, ताडील), सूरज जगताप (वनरक्षक, बांधतिवरे), वि. दा. झाडे (वनरक्षक, खेडीं), आणि शुभांगी गुरव (वनरक्षक, कोंगळे) यांच्या पथकाने केली.

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीव शिकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याला बक्षीस दिले जाईल.