नागपूर : केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी नागरिकांना करोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले. त्यानंतरही २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागपुरातील १०.३४ तर राज्यातील १९.२७ टक्के नागरिकांनी लसीची पहिलीच मात्रा घेतली नाही. पहिली मात्रा घेतलेल्या राज्यातील ५६.८० टक्के तर नागपुरातील ५०.०८ टक्के नागरिकांची दुसरी मात्रा घेणे बाकी असल्याचेही आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.
राज्याची एकूण लोकसंख्या १२ कोटी ४४ लाख ३६ हजार ९९९ च्या जवळपास आहे. आरोग्य विभागाच्या निकषानुसार, त्यातील ७३.४८ टक्केच्या जवळपास म्हणजे ९ कोटी १४ लाख ३५ हजारांच्या जवळपास लोकसंख्या १८ वर्षांवरील असून त्यांना करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मुभा दिली गेली आहे. लहान मुलांचे अद्यापही लसीकरण सुरू व्हायचे आहे. १८ वर्षांवरील नागरिकांच्या नि:शुल्क लसीकरणाची सोयही केली गेली आहे. त्यानंतरही राज्यातील लसीकरणाचे लक्ष्य निश्चित केलेल्यांपैकी ८०.७३ टक्केच नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे.
नागपूर जिल्ह्यात ५० लाख ९५ हजार ४०५ लोकसंख्या आहे. यापैकी १८ वर्षांवरील ३७ लाख ४४ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. त्यातील ८९.६६ टक्के म्हणजे ३३ लाख ५६ हजार ८२६ नागरिकांना लसीची पहिली मात्रा घेतली आहे. राज्यात ५६.२० टक्के नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली नाही. नागपुरात पहिली मात्रा घेतलेल्या ५०.०८ टक्के नागरिकांची दुसरी मात्रा घेणे शिल्लक आहे. दरम्यान, सर्वाधिक पहिल्या मात्रा घेतलेल्या शहर, जिल्ह्यांमध्ये मुंबईचा क्रमांक पहिला आहे. येथे आरोग्य विभागाकडून निश्चित लक्षाच्या तुलनेत १०२.४२ टक्के लसीकरण झाले आहे. त्यानंतर पुणे (९७.२७ टक्के), भंडारा (९३.२७ टक्के), सिंधुदुर्ग (९२.४० टक्के), नागपूर (८९.६६ टक्के), रायगड (८८.८० टक्के), गोंदिया (८८.६७ टक्के), सातारा (८८.५७ टक्के), रत्नागिरी (८८.०२ टक्के), कोल्हापूर (८७.३० टक्के), सांगली (८६.०७ टक्के), चंद्रपूर (८७.३० टक्के), वर्धा (८५.५४ टक्के) लसीकरण झाले आहे.