दापोली – शहरातील काळकाई कोंड इथं मालमत्तेच्या वादातून भावकीत कंदाल झाल्यानं दापोली पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील माणसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जाधव कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना लाठी काठीने मारहाण केल्याची घटना काळकाई कोंड इथं घडली आहे.
याबाबत दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी दखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 4 जण जखमी असून 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुशांत जाधव (52 काळकाईकोंड, दापोली) यांनी पोलीसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घराचे वाटपाविषयी चर्चा करत असताना संशयित आरोपी प्रशांत जाधव, पंकज जाधव, प्रणय जाधव, शेखर जाधव, मिताली जाधव, सुप्रिया जाधव (सर्व रा. काळकाईकाड दापोली) यांनी मिळून धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली.
हे भांडण सोडवण्यासाठी राजीव जाधव, श्रीकांत जाधव, सायली जाधव गेल्या असता त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. असे तक्रारीत म्हटले आहे.
तर दुसऱ्या बाजूने सुप्रिया जाधव (27, काळकाई कोंड, दापोली) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुशांत जाधव हे एकाच बिल्डींगमध्ये राहणारे आहेत. दोघांच्यात वडिलोपार्जित इमारतीवरुन वाद आहेत.
24 सप्टेंबर रोजी हिस्से वाटपाबाबत मिटींग घेण्यात आली होती. मिटींगमध्ये सुशांत जाधव यांनी आरडाओरडा करुन शिवीगाळ करत निर्णय मान्य नसल्याचे सांगितले.
तसेच प्रशांत जाधव, शेखर जाधव, प्रणय जाधव, पंकज जाधव यांना ठार मारण्याची धमकी दिली व मारहाण करायला सुरुवात केली. सुशांत यांनी सुप्रिया यांना केस ओढून भिंतीवर आपटले.
यामध्ये सुप्रिया यांच्या डोक्याला दुखापत होवून रक्तस्राव झाला. त्यानंतर सुशांत यांनी बाहेर जावून काठी आणून चौघांनाही मारहाण केली. यामध्ये सुप्रिया जाधव (27) या जखमी झाल्या.
दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 14 जणांवर भा.द.वि. कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार सुकाळे आणि पोलीस नाईक नलावडे करत आहेत.