दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत सुमारे 9 कोटी 88 लाख 17 हजार 600 रूपये इतकी आहे.

पोलिसांना सापडलेल्या या चरसची किंमत आणखी जास्त असू शकते. कारण जप्त केलेल्या मालाची किंमत काढताना औषध निर्मितीसाठी लागणारी किंमत गृहीत धरली जाते. पण अमली पदार्थ म्हणून त्याची किंमत खूप असते, असं पोलिसांतील सूत्रांनी माहिती दिली.

चरसच्या पॅकिंगवरून अफगाणिस्तान, पाकिस्तानातून हा साठा आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, ही कारवाई दापोली कस्टम विभाग आणि दापोली पोलीस यांनी संयुक्तपणे केली.

14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संवेदनशील ठिकाणी तसेच समुद्रकिनाऱ्यावर सीमा शुल्क विभागाची करडी नजर होती.

या गस्तीदरम्यान दापोली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्दे किनाऱ्यावर एक बेकायदेशीर पॉली बॅग आढळून आली होती.

या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये 10 संशयास्पद पॅकेट आढळून आली. त्याचे वजन सुमारे 11.88 किलोग्रॅम होते.

त्या पिशवीमध्ये असणारा पदार्थ ओलसर होता. समुद्रातून किनाऱ्यावर वाहून आलेला असल्यामुळे तो ओलसर झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

पिशवीमध्ये असणाऱ्या पदार्थ हा वासावरून व पाहणी दरम्यान चरस असल्याचा संशय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आला होता.

दापोली पोलीसांनी या शोध मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दापोली पोलिसांचं कौतुक केलं आहे.