आंजर्ले खाडीत एक नौका बुडाली, खलाशी सुखरूप

हर्णे : आंजर्ले खाडीमध्ये एका नौकेला पूर्णपणे जलसमाधी मिळाली तर दुसरी नौका बुडणाऱ्या नौकेला वाचवायला गेली म्हणून गाळात रुतून प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी  झाली नाही. दोन्हीही नौकांवरील सर्व खलाशी सुखरूप असल्याचं येथील मच्छीमारांनी सांगितले.

शासनाच्या नियमाप्रमाणे १ ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात झाली. परंतु मासळीचा दुष्काळाचं असल्याने हजारो नौकांपैकी फक्त सुमारे १५० ते २०० नौका आंजर्ले खाडीतून मासेमारीला समुद्रात गेल्या आहेत. काल ता. ५ ते ९ पासून शासनाकडून वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता. वासुदेव हशा दोरकुळकर यांची “सिद्धी सागर” ही दोन सिलेंडरची नौका ५ दिवसांपूर्वी मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. गेल्या पाच दिवसांच्या मासेमारीमध्ये मासळी मिळालीच नाही. कालच्या शासनाच्या सतर्कतेच्या आदेशावरून नौका आंजर्ले खाडीत नेण्याचे ठरवून आज सकाळी ११ च्या सुमारास ते आंजर्ले खाडीत येत होते. आंजर्ले खाडीत प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे नौका आत घेणे खूप फमोठी तारेवरची कसरत या मच्छीमारांना करावी लागते. त्याप्रमाणे वासुदेव दोरकुळकर यांची नौका गाळाच्या जवळ येताच जोरदार लाटांचे तडाखे बसत होते त्याचवेळी पाण्याला ओहोटी असल्याने नौका गाळावर येताक्षणी पंख्यात दोर अडकुन पंखा बंद पडून मशीन बंद पडल्याने नौका मध्येच पाण्यात अडकली एकीकडे जोरदार लाटांचे तडाखे चालू असल्याने नौका जागेवर फुटली आणि नौकेत वेगाने पाणी शिरल्याने पूर्णपणे जलसमाधी मिळाली. दुसरी प्रकाश दोरकुळकर यांची “वैष्णवी” नौका खाडीत येत असताना त्यांना वाचवायला गेली तेंव्हा नौका वाचवू शकले नाही परंतु प्रकाश यांच्या नौकेवरील तांडेल मोहन रघुवीर व बरोबर असणाऱ्या खलाशांनी वासुदेव दोरकुळकर यांच्या नौकेवरील सर्व खलाशांना वाचवले. त्यामध्ये दोघा खलाशांना दुखापत झाली आहे. त्यांना पाजपंढरी येथील खाजगी रुग्णालयात नेऊन आणण्यात आले. यामध्ये स्वतः वासुदेव हशा दोरकुळकर , नारायण हशा दोरकुळकर, नामदेव दोरकुळकर आणि अक्षय जुवाटकर असे चौघेजण खलाशी होते. त्याचवेळी प्रकाश दोरकुळकर यांची नौका खाडीच्या तोंडावरच असणाऱ्या गाळात रुतली. मोठा प्रसंग बेतला होता ही सुद्धा नौका बुडाली असती यावेळी वारा जोराचा सुटला होता तसेच जोरदार लाटांचे दणके बसत होते. या अशा खराब वातावरणामुळे कोणती दुसरी नौका पुन्हा या नौकेला वाचवायला येणे अशक्य होते. सगळे मच्छीमार बांधव धावले आणि त्यांनी दोरखंडाच्या साहाय्याने तिला किनाऱ्यावर आणले परंतु सद्यस्थितीत प्रकाश दोरकुळकरांची “वैष्णवी” ही नौका वाळूत रुतलेलीच आहे. या नौकेचे सुद्धा इंजिन बंद पडले. आणि लाटांच्या तडाख्याने नौकेला दणका बसला होता त्यामुळे प्रकाश यांच्या नौकेचे अंदाजे ५ लाखांचे तर वासुदेव दोरकुळकर यांच्या नौका पूर्णपणे बुडून सर्व सामान समुद्रात वाहून गेल्याने किमान १५ लाखाचे नुकसान झाले आहे. वासुदेव यांचा कमवायचा एकच आधार होता तोदेखील आता हातातून गेला असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तेंव्हा शासनाकडून वासुदेव दोरकुळकर व प्रकाश दोरकुळकर याना तातडीची मिळावी अशी अपेक्षा या मच्छीमार बांधवांकडून होत आहे.

आजच्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे आणि खाडीतल्या प्रचंड गाळामुळे नौकेला जलसमाधी मिळण्याची घटना घडली आहे. आम्हा मच्छीमारबांधना या आशा वादळामध्ये आंजर्ले खाडीशिवाय दुसरा आसरा नाही तेंव्हा शासनाला विनंती आहे की गाळ काढण्याचं काम मंजूर झाला आहे तर ते लवकरात लवकर हाती घेऊन आम्हाला खाडीचा भाग मोकळा करून घ्यावा म्हणजे अशा दुर्घटना होणार नाहीत; असे येथील मच्छीमार गणेश चोगले यांनी सांगितले.

वासुदेव हशा दोरकुळकर यांच्या नौकेला पूर्णपणे जलसमाधी मिळालेली आहे. त्या नौकेतील खलाशी जखमी देखील झाले होते. त्यांच्या नौकेला माझी नौका वाचवायला गेली आणि माझी नौका देखील इंजिन बंद पडून गाळात रुतल्यामुळे माझे किमान ५ लाखाचे नुकसान झाले आहे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन तातडीची तरी मदत घ्यावी अशी विनंती आहे; असे नुकसानग्रस्त वैष्णवी नौकेचे मालक प्रकाश दोरकुळकर यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*