रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं दिला जाणारा प्रतिष्ठित वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार  पुरस्कार यंदा कोकणातून रत्नागिरी तालुका पत्रकार संघाला प्राप्त झाला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  तालुका संघाच्यावतीनं तालुकाध्यक्ष राजेश शेळके, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण देवरूखकर, सचिव आनंद तापेकर, मुश्ताक खान, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील आणि जमीर खलफे यांनी पुरस्कार स्विकारला.

यावेळी माजी मंत्री खा. राजेंद्र गावित, आ. चिंतामणी वानगा,मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजाजन नाईक आणि राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारितेची धार जणीवपूर्वक बोथट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीमध्ये लेखणीची ताकद कमी करणाऱ्यावरच राजद्रोहा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी भूमिका विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली. पत्रकारांबद्दल संशयाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. पण पत्रकारिता धोक्यात आली तर लोकशाहीसुद्धा खिळखिळी होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. आमच्यावर तुम्ही टीका केलीत तर आम्ही तुमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार नाही, असंही ते म्हणाले.

सामाजिक जाणिव असलेले पत्रकार कधीही चुकीचं वागत आहे, असं मत माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी व्यक्त केलं. पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कार्य करावं. पत्रकारांविरोधात हत्यार म्हणून वापरलं जाणारं भा.द.वि. कलम 353 रद्द करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. त्याचबोबर पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकारनं प्रयत्न करणं आवश्यक आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.