गुहागरमध्ये जिल्हा परिषद उपअभियंता ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

रत्नागिरी : गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याला बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपी उपअभियंता संजय तुळशीराम सळमाखे असे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी १६ डिसेंबर रोजी करण्यात आली.

तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार झाले होते. या देयकावर उपअभियंता संजय सळमाखे यांची स्वाक्षरी आवश्यक होती. तसेच, कामाच्या फोटोंवरही स्वाक्षरीची गरज होती.

१२ डिसेंबर रोजी तक्रारदार देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी सळमाखे यांच्या कार्यालयात गेले असता, त्यांनी देयक आणि फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे एसीबीने पडताळणी केली आणि मंगळवारी १६ डिसेंबर रोजी सापळा रचला. सळमाखे यांनी पुन्हा ७ हजार रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारण्यास तयार झाले. गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयातील त्यांच्या दालनात तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले.

या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*