युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर

रत्नागिरी – कोकणातील ग्रामीण भागातील समस्यांना डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून धडाडीने वाचा फोडणारे ‘ग्रामीण वार्ता’ न्यूज डिजिटल मीडियाचे संस्थापक मुझम्मील काझी यांना ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’तर्फे प्रतिष्ठेच्या ‘कोकण रत्न पदवी’ने सन्मानित करण्यात येणार आहे. अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी याची अधिकृत घोषणा केली.

उक्षी गावचे सुपुत्र असलेले मुझम्मील काझी हे गाव विकास समिती रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. गेल्या आठ वर्षांत त्यांनी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न, स्थानिक समस्या आणि प्रशासकीय त्रुटी निःपक्षपणे उजेडात आणल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अनेकदा गंभीर दखल घ्यावी लागली.

विविध युट्यूब चॅनेल्सवर यशस्वी कामगिरी केल्यानंतर मुझम्मील काझी यांनी ‘ग्रामीण वार्ता’ची स्थापना केली. या माध्यमातून गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदानही मोलाचे ठरले आहे.

‘कोकण रत्न पदवी’ समारंभ लवकरच संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत. मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड यांचीही उपस्थिती राहील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*