रत्नागिरी- पहिली ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन २६ जानेवारीला घेण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी चर्चा केली. कोरोनाची तिसरी लाट आणि ओमीक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गेल्या वीस दिवसात राज्यात कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण सारखे नाही. त्यामुळे प्रादुर्भाव कमी असलेल्या भागातील शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे राज्य शासनाने पहिली ते बारावीच्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून 24 जानेवारीपासून चालू करा अशा सुचना दिल्या आहेत.

शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सहमती दर्शवली. त्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. सध्या जिल्ह्यात दररोज 200 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत.

शाळा चालू करण्यापुर्वी पुढील दोन दिवसात काय स्थिती राहील यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री अ‍ॅड. परब 26 जानेवारीला ध्वजारोहणाला रत्नागिरीत येणार आहेत. त्यावेळी आढावा घेऊन शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. शाळा व महाविद्यालये चालू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नियमावली जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानंतर पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी चालू झाली होती; परंतु जिल्ह्यात अजुनही कोणतेच आदेश न काढल्यामुळे शाळा व्यवस्थापन, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.