कडवईच्या स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न कधी सुटणार? ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठेतील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आजही पक्का रस्ता उपलब्ध नाही.

गेल्या सत्तर वर्षांपासून ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी मृतदेह वाहून नेताना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

कडवई, वाणीवाडी, बाजारपेठ आणि समर्थनगर या भागातील रहिवाशांना अंत्यसंस्कारासाठी नदीपलीकडील स्मशानभूमीचा वापर करावा लागतो.

मात्र, तिथे जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात मुसळधार पावसात पाण्याचा प्रवाह पार करून मृतदेह न्यावे लागतात.

अनेकदा तरुणांना मानवी साखळी बनवून जीव धोक्यात घालावा लागतो. प्रसंगावधानाने आतापर्यंत अनर्थ टळला असला, तरी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.

यापूर्वी स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित होता, परंतु तो आता सामोपचाराने मिटला आहे. तरीही रस्त्याचा प्रश्न कायम आहे.

ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून रस्ता आणि पूल बांधण्याची मागणी केली, पण न्यायालयीन वादाचे कारण पुढे करत प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला.

आता वाद मिटल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि पूल बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अन्यथा, लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या समस्येकडे आमदार शेखर निकम लक्ष घालतील का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*