राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठी व सनियंत्रणासाठी बाँबे नर्सिंग हाेम अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी विधान परिषदेत दिली. हा कायदा आणण्यासाठी 18 तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सदस्य डाॅ. मनिषा कायंदे यांनी मुंबईत बाेगस पॅथाॅलाॅजी प्रयाेगशाळेची वाढत चाललेली संख्या व पॅथालाॅजी प्रयाेगशाळेतील गैरप्रकारांबाबत लक्षवेधी मांडली हाेती. तिला उत्तर देताना टाेपे बाेलत हाेते. आराेग्य सेवा विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्राशी निगडित आराेग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, महाराष्ट्र पॅरामेडिकल परिषद, अन्न व औषध प्रशासन, तसेच पॅथाॅलाॅजिस्ट, मायक्राेबायाेलाॅजिस्ट संघटना व तंत्रज्ञांच्या विविध अशासकीय संस्था अशा 18 तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापण्यात आली आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यांत प्राप्त हाेईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे टाेपे सांगितले. कायदा अस्तित्वात येईपर्यंत पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर ठेऊन यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.