दापोली: दापोली नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित चार जागांवर उद्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.या आधी १३ जागांसाठी दोन्ही ठिकाणी निवडणूक झाली आहे.या मतदानासाठी निवडणूक प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. दापोलीत चार वॉर्डात वीस मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर पाच ते सहा कर्मचारी असणार आहेत.
दापोली नगरपंचायतीच्या ४ प्रभागांसाठी हि निवडणूक होत असून या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ (अहमदनगर) या प्रभागातून ३ उमेदवारांमध्ये लढत होणार असून यात संचिता जोशी (अपक्ष, शिवसेवा विकास आघाडी) , साधना धाडवे (भाजप), नौशीन गिलगिले (शिवसेना). प्रभाग क्रमांक ६ (पोस्टआळी) मध्ये ४ उमेदवार रिंगणात आहेत त्यात श्वेता दुर्गावळे (अपक्ष, शिवसेवा विकास आघाडी), वेदा गोरे (भाजप), सारिका देसाई (मनसे), साधना बोथरे (राष्ट्रवादी) या महिला उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ८ (फँमिली माळ ०६) या प्रभागात ६ उमेदवार रिंगणात आहेत यात प्रशांत पुसाळकर (अपक्ष), रवींद्र क्षीरसागर (शिवसेना), प्रसाद मेहता (काँग्रेस), अरविंद पुसाळकर (मनसे), दिलीप भैरमकर (अपक्ष, शिवसेवा विकास आघाडी), ऋषीकेश हेदुकर (भाजप), यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ९ (फँमिली माळ ०७) या प्रभागातून जावेद सारंग (अपक्ष, शिवसेवा आघाडी), अझीम चिपळूणकर (शिवसेना), जितेंद्र महाडीक (भाजप), किरण घोरपडे (अपक्ष) हे ४ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी ५ मतदान केंद्र असून त्यात अहमदनगर प्रभागासाठी जिल्हा परिषद शाळा गाडीतळ, पोस्टआळी प्रभागासाठी गोखले कन्याशाळा, फँमिली माळ प्रभाग क्रमांक ८ व ९ साठी आर.आर. वैद्य इंग्लिश मिडीअम स्कूल येथे मतदान केंद्र असणार आहेत. मतदान केंद्रावर ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. आर.आर. वैद्य इंग्लिश मिडीअम स्कूल येथील मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रांताधिकार शरद पवार,तहसीलदार वैशाली पाटील,मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा सज्ज असुन प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन ढेरे हे कायदा सुव्यस्थेवर लक्ष ठेवून आहेत.