राज्यात रोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

मुंबई- राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत सुमारे ८१ लाख नागरिकांना लस देण्यात आली असून, देशात लसीकरणात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे, अशी माहिती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. करोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक मंगळवारी झाली. या वेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरू असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता आदी या वेळी उपस्थित होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. ५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज ४ लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ८० लाखांहून अधिक लोकांना लसीकरण करून महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करतानाच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी या वेळी केल्या. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची राज्य सरासरी १२.३ टक्के असून भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा पुरवठा होण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*