नवी दिल्ली : करोना योद्धय़ांसह लसीकरण मोहीम सुरू करण्याच्या धोरणाचा करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फायदा झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. ९० टक्के आरोग्य व्यावसायिकांनी यापूर्वीच पहिली मात्रा घेतली असल्यामुळे लशींनी बहुतांश डॉक्टरांची सुरक्षितता निश्चित केली असल्याचे ते म्हणाले.

चाचणी असो, औषधांचा पुरवठा असो की विक्रमी वेळेत नव्या पायाभूत सोयींची उभारणी असो, हे सर्व अतिशय वेगाने होत असल्याचे मोदी यांनी डॉक्टरांच्या एका गटाशी दूरसंवादाच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. विरोधी पक्ष सरकारच्या लसीकरण कार्यक्रमावर टीका करत असताना आणि सरकारने करोना महासाथीची दुसरी लाट वाईट रीतीने हाताळल्याचा त्यांनी आरोप केला असताना मोदी यांनी हे विधान केले आहे.

प्राणवायूची निर्मिती आणि पुरवठा यांच्या आव्हानांवर मात करण्यात येत आहे. उपचारात एमबीबीएस विद्यार्थ्यांना सामावून घेणे, तसेच ग्रामीण भागात आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांची सेवा घेणे यांसारखे मनुष्यबळ वाढवण्याच्या उपायांमुळे आरोग्य यंत्रणेला अतिरिक्त मदत मिळाली असल्याचेही ते म्हणाले.

देशात २४ तासांत २,८१,३८६ बाधित

देशात गेल्या २४ तासांत २,८१,३८६ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २,४९,६५,४६३ वर पोहोचली. याच कालावधीत ४१०६ जण मृत्युमुखी पडल्यामुळे करोना मृत्यूंचा आकडा २,७४,३९० इतका झाला आहे.