रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले जात असून अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे
दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली आहे. दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन भारताकडेही मदत मागणार आहे.
युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी यासाठी विनंती करणार आहेत. “भारताचे रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करणार आहोत,” असं ते म्हणाले आहेत.