रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेकडून उद्धवसेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत.

राजन साळवी आणि संजय कदम या माजी आमदारांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात उद्धवसेना कमकुवत झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघात पराभव झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच संजय कदम यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

आता येथे अमोल कीर्तिकर यांच्यावर ठाकरे सेनेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

त्यांच्या माध्यमातून उद्धवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुंबईमध्ये खासदार रविंद्र वायकर यांच्याकडून थोड्या फरकाने पराभव झाला होता.

कीर्तीकर यांच्यावर पुन्हा दापोली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या निवडणुकीत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाल्यानंतर अमोल कीर्तिकर यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती.

त्यांनी येथे कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला होता. मात्र योगेश कदम यांचा येथील राजकारणात प्रवेश झाल्यानंतर अमोल कीर्तीकर येथून परत गेले.

आता संजय कदम यांनी शिंदेसेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे दापोली मतदारसंघात उद्धवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

पक्षात असलेल्या निष्ठावंत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी अमोल कीर्तिकर यांच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.

मंगळवार २५ पासून २८ मार्चपर्यंत ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.