– श्रीमती मीना सामंत (महेश सामंतची आई), रत्नागिरी

उदय सामंत यांना मी 1992-93 पासून ओळखते. माझा मुलगा महेश सामंत यांची त्यांच्याशी कॉलेजमध्ये भेट झाली. ते त्यावेळी महेशच्या एक वर्ष पुढे होते. परंतु सामंत नाव असल्याने साहजिकच त्यांना त्याबद्दल जवळीक वाटली आणि त्यांची ही जवळीक आजपर्यंत किंचितही कमी झाली नाही.

सर्वांशी मिळून मिसळून वागणे, हसत खेळत बोलणे त्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. मी शासकीय सेवेत होते. त्यामुळे मी दुपारी घरी नसे.

महेश सोबत दुपारी कधीतरी त्यांचे मित्र येत असत. त्यांच्या बरोबर उदय सामंतही कधीतरी असे. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, श्रीमंत-गरीब भेदभाव न करणारे, सर्वांच्या अडीअडचणीत मदत करणारे असे व्यक्तीमत्व.

कधी कधी मी महेशसाठी माशांचे जेवण करून ठेवत असे. त्यातील बांगड्याचे मासेही ते चवीने खात असत.

एकदा भाऊबिजेच्या दिवशी (त्यावेळी ते आमदार नव्हते) महेश सोबत ते आमच्याकडे आले होते. त्यांच्या राजकारणाची नुकतीच सुरूवात झाली होती. त्यांचा मित्र केदार पटवर्धन ही सोबत होता.

माझ्या बहिणीही तेव्हा आल्या होत्या. त्यावेळी मी मटणाचे जेवण करीत होते.

उदय सामंत व केदार पटवर्धन यांना मी दिवाळीच्या फराळाची डिश भरून त्यांच्या समोर ठेवली. पण ते म्हणाले, हे आम्हाला नको. आता तुमच्या घरात जो वास येतो आहे, ते आम्हाला द्या.

मग मी त्यांना मटण व ब्रेड दिला. असे मिश्किल स्वाभावाचे सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, त्यावेळी काहीतरी राजकारणातला विषय झाला, त्यावेळी मी त्यांना म्हटले होते, तुम्ही मंत्री होणार.

त्यावर माझी बहिण त्यांना म्हणाली, तुम्ही मंत्री झालात की, आमच्या मुलाला नोकरी द्या. ते आमदार झाले त्यावेळी त्यांनी माझा मुलगा महेश सामंत याला त्यांनी त्यांचा शासकीय पी.ए. म्हणून नेमले..

बरीच माणस मला म्हणत होती, महेशला येथे ठेवू नका. त्याला काम जमणार नाही. पण मला उदय सामंत यांच्या बद्दल खात्री होती, की ते महेशला सांभाळून घेतील.

त्यांनी आजपर्यंत त्याला आपल्या लहान भावाप्रमाणे वागविले आहे. महेशने पण त्या वेळेपासून उदय सामंत व त्यांचे भाऊ किरण सामंत यांचे काम प्राधान्याने व तळमळीने केले आहे.

महेश सहा महिने आजारपणामुळे घरी होता. तरी पण त्यांनी दर महा आपल्याकडील पैसे देऊन त्याची गरज भागवली आहे. आणि अजूनही त्याच्या अडअडचणीला ते खंबीरपणे मदत करतात.

माझ्या मुलासाठीच नाही तरी त्यांचे कोणी कार्यकर्ते किंवा त्यांचे नातेवाईक आजारी असले तरी ते सढळ हाताने मदत करतात.

कुणाला शिक्षणासाठी, लग्नासाठी मदत करतात. माझ्या मुलाच्या लग्नाचा खर्चही त्यांनी व त्यांचे भाऊ किरण सामंत यांनी केला आहे.

आताच्या काळात कोण एवढे करणार आहे. आमच्यासाठी ते देवदूत आहेत.

त्यांचे भाऊ आई-वडीलही सर्वांना मदत करतात. त्यांचे आईबरोबर मी फोनवर कधीतरी बोलते. अतिशय प्रेमाने बोलतात, चौकशी करतात. त्यांचेच मूळ उदय सामंतांमध्ये उतरले आहेत.

उदय सामंत कुणाबद्दलही अपशब्द बोलत नाहीत, कोणत्याही कठीण परिस्थितीतून व कोणाचेही मन न दुखावता मार्ग काढणे ही त्यांची खासीयत आहे.

त्यांचे बद्दल बोलण्यासाठी व लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतात. उदय सामंत यांचेवर परमेश्वराची कृपा आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व त्यांना उदंड आयुष्य लाभो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.

ADVERTISEMENT