चिपळूण:- येथील मालदोली या गावातील ६२ महिलांनी नागली मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन नाचणीपासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त मुल्यवर्धीत पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिकाव्दारे प्रशिक्षण घेतले.
हे प्रशिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, घरडा केमिकल्स, लोटे यांच्या मुख्य प्रायोजकत्वाने आणि कामधेनू कृषी विकास प्रतिष्ठान, जालगाव यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी लाडघर येथील प्रथितयश महिला प्रशिक्षक श्रीमती प्रियांका कर्देकर यांनी नाचणीपासून नाचणी सत्व, नाचणी लाडू, इडली, अणे, चॉकलेट, पापड, शेवया यांचे प्रात्यक्षिकाव्दारे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षण वर्गासाठी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष वरखडेकर यांनी आयोजन केले होते. तसेच घरडा केमिकल्सचे तुषार हळदवणेकर आणि बापूराव पवार यांनी प्रशिक्षणाचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमामध्ये गावातील सरपंच अबिदा तांबे, उपसरपंच योगेश भोबेकर, माजी पंचायत समिती पांडुरंग माळी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तसेच माजी सरपंच सरिता माळी आणि तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश हरवंदे, बचत गटातील सर्व महिला आणि सीआरपी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी कामधेनू प्रतिष्ठानचे विशाल बोरघरे व अन्य सदस्य उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक, डॉ. प्रमोद सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच घरडा केमिकल्स लोटेचे आर. सी. कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन लाभले.