राजापूर: राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव श्रावण विकास भोवड असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

देवीहसोळ गावातील लिंगवाडी भागातील विकास भोवड यांचा मुलगा श्रावण याला सर्पदंश झाला होता. सुरुवातीला सर्पदंशाची कल्पना न आल्याने उपचारास विलंब झाला आणि त्याची प्रकृती गंभीर झाली. त्रास जाणवू लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तपासणीनंतर सर्पदंश असल्याचे निष्पन्न झाले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी पहाटे श्रावणने अखेरचा श्वास घेतला. मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या श्रावणच्या निधनाने देवीहसोळ गाव शोकसागरात बुडाले आहे.