रत्नागिरी दि. 10 : भारताचे महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे 12 फेब्रुवारी 2022 रोजी येत असून त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाने व इतर विभागांनी केली असून हा दौरा उत्तम प्रकारे पार पडेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंडणगड येथे व्यक्त केला.
ते म्हणाले, मा. राष्ट्रपती महोदय यांच्या आंबडवे, ता. मंडणगड दौरा अनुषंगाने विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा, राजशिष्टाचार, येथील रस्ते, तसेच त्यांच्या आगमनाच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य विभाग यासह इतर शासकीय विभाग दिलेली जबाबदारी तंतोतंत पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. मा. राष्ट्रपती महोदयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.
मा. राष्ट्रपती महोदय पहिल्यांदाच आंबडवे, ता. मंडणगड या ठिकाणी येत असून हा त्यांचा दौरा शांततेत व सुरळीत पार पडण्याची दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व इतर विभागांसह येथील नागरिकांचीही मोठी जबाबदारी आहे. येथील नागरीक, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही हा दौरा शांततेत व सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी केले आहे.