दापोली :- दापोली शहरातील बाजारपेठ परिसरात चोरट्याने एकाच रात्री तीन ते चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर दुकाने व एक घर फोडले. मंगळवारी (दि. १६) पहाटे 4.20 च्या सुमारास चोरट्यांनी दापोली बाजारपेठेमधील सेंट्रल मेडिकलवर डल्ला मारला. या ठिकाणी काउंटरमधील रक्कम लंपास केली.

तर मेडिकलच्या बाजूला असणाऱ्या तांबडे टेलर दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी काहीही हाती न लागल्यामुळे शिवून ठेवलेले कपडे घालून बघण्याचा प्रयत्न केला. परंतु मापाचे कपडे नसल्याने ते कपडे तसेच अस्ताव्यस्त टाकून चोरट्यांनी पलायन केले. प्रभूआळी येथील राम मंदिराशेजारी असणारे प्रधान यांच्या घरात कुलूप तोडून प्रवेश केला. प्रधान हे मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांच्या घरातून कोणते साहित्य, मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे समजू शकलेले नाही.

नामदेव मंदिराजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांचे बुधवारी सकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी चित्रीकरण झाल्याचे आढळून आले आहे. चोरटा प्रथम गाडीतळाकडून नामदेव मंदिराच्या गल्लीकडे चालत येताना स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी बाजारपेठ रस्त्याने गाडी आल्यामुळे चोरटा पुन्हा मागे वळून आलेला दिसत आहे. गाडी गेल्यानंतर त्याने दोन्ही बाजूला बॅटरीच्या सहाय्याने कोणी येत आहे का? याची पाहणी केल्याचे दिसत आहे.

त्यानंतर मेडिकल स्टोअरच्या शटरचा दरवाजा खोलून त्याने आतमध्ये प्रवेश केल्याचेही दिसत आहे. चोरट्याने चेहऱ्यावर कपडा गुंडाळलेला असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार काही संशियतांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. दापोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत.